के. के. रेंज विस्ताराच्या हालचाली – Maharashtra TimesUpdated: 15 Jan 2020, 04:00:00 AM

1 month ago
32 Views

के. के. रेंज विस्ताराच्या हालचाली

Maharashtra TimesUpdated: 15 Jan 2020, 04:00:00 AM

सुरक्षा क्षेत्र ठरविलेल्या जागेचे मूल्यांकन तयारम टा प्रतिनिधी, नगरनगरजवळील लष्कराच्या के के…

सुरक्षा क्षेत्र ठरविलेल्या जागेचे मूल्यांकन तयार

म. टा. प्रतिनिधी, नगर

नगरजवळील लष्कराच्या के. के. रेंज या युद्ध प्रशिक्षण व सराव क्षेत्राच्या विस्तारीकरणाच्या हालचाली सुरूच आहेत. यासाठी वेगवेगळ्या पर्यायांची चाचपणी सुरू असून पूर्वी सुरक्षा क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आलेल्या जागेचे महसूल विभागाकडून मूल्यांकन करून घेण्यात आले आहे. यावर संरक्षण विभागाकडून अद्याप पुढील निर्णय झालेला नाही. यासोबतच ‘के.के. रेंज २’ चा विचार वरिष्ठ पातळीवरून सुरू असल्याची माहिती मिळाली. ज्या-ज्या वेळी विस्तारीकरणाचा मुद्दा पुढे येतो, त्या वेळी सभोवतालच्या गावांतून मोठा विरोध होत असल्याने प्रशासनाकडून काळजीपूर्वक पावले उचलली जात असल्याचे दिसून येते.

सोमवारी लष्कराचा वार्षिक सराव या ठिकाणी झाला. त्या वेळी आर्म्ड कोअर सेंटर अँड स्कूलचे प्रमुख मेजर जनरल एस. झा यांना प्रसारमाध्यमांकडून के. के. रेंजच्या प्रस्तावित विस्तारीकरणासंबंधी प्रश्न विचारला. त्याला उत्तर देताना झा यांनी, विस्तारीकरण आवश्यक असस्याचे सांगत यासाठी आम्ही जागा मिळविण्याचा प्रयत्न करीत असल्याचे सांगितले. यासंबंधी जिल्हा प्रशासनाकडून काय हालचाली सुरू आहेत, याची माहिती घेण्याचा प्रयत्न केला असता प्रशासनाकडून संरक्षण विभागाला के.के. रेंज – १ संबंधी आ‌वश्यक असलेली माहिती सुमारे वर्षभरापूर्वीच पाठविण्यात आल्याचे समजले. त्यामुळे विस्तारीकरणाचा मुद्दा अद्याप सुरूच असल्याचे स्पष्ट होते. के. के. रेंजभोवती नगर, राहुरी व पारनेर तालुक्यांतील २३ गावांतील काही क्षेत्र हे ‘सुरक्षा क्षेत्र’ म्हणून घोषित करण्यात आले आहे. यामध्ये सरकारी, वन व खासगी जागेचा समावेश आहे. या जागेचे मागील वर्षीच मुद्रांक विभागाच्या मार्फत मूल्यांकन करण्यात आले असून ते ७९१ कोटी रुपये झाले आहे. ही माहितीही जिल्हा प्रशासनाने लष्कराला फेब्रुवारी २०१९ मध्ये पाठवली आहे. हा प्रस्ताव ‘के.के.रेंज – १’ आहे. याशिवाय के.के. रेंज – २ यावरही काम सुरू असल्याची माहिती आहे, त्याचा तपशील मात्र मिळू शकला नाही.

सध्याच्या प्रस्तावानुसार या क्षेत्राच्या जवळ असणाऱ्या २३ गावांतील काही क्षेत्र हे ‘सुरक्षा क्षेत्र’ म्हणून घोषित केले आहे. यामध्ये पारनेर तालुक्यातील पाच गावांतील १४ हजार १७८ हेक्टर, राहुरी तालुक्यातील बारा गावातील १३ हजार ५१८ हेक्टर आणि नगर तालुक्यातील सहा गावांतील १ हजार १२१ हेक्टर क्षेत्राचा समावेश आहे. हे क्षेत्र ताब्यात मिळावे, यासाठी २०१७ पासून प्रयत्न सुरू आहेत. हा विषय पुढे आल्यानंतर स्थानिक नागरिकांनी त्याला सुरुवातील विरोध केला होता; मात्र, त्यानंतर प्रशासकीय पातळीवर बैठका होऊन ‘सुरक्षा क्षेत्र’ म्हणून घोषित केलेल्या जागेचे मूल्यांकन करण्याचे निश्चित करण्यात आले होते. ऑक्टोबर २०१८ मध्ये याबाबत प्रशासनाने बैठक घेतली होती. त्यानंतर मुद्रांक विभागाच्या मार्फत ‘सुरक्षा क्षेत्र’ म्हणून निश्चित करण्यात आलेल्या जागेचे मूल्यांकन करण्यात आले असून ही रक्कम ७९१ कोटी रुपये आली आहे. ही माहिती लष्कराला फेब्रुवारी २०१९ मध्येच जिल्हा प्रशासनाने कळवली आहे. मूल्यांकनाची माहिती लष्कराला कळवून अकरा महिन्यांचा कालावधी झाला असून आता पुढील निर्णय त्यांच्याच पातळीवर होणार असल्याचे सांगण्यात येते.

कोट :

‘के.के.रेंज – १’ चे ‘सुरक्षा क्षेत्र’ म्हणून घोषित केलेल्या २३ गावांमधील जमिनीचे मूल्यांकन करून याची माहिती लष्कराला मागील वर्षीच कळवण्यात आली आहे. आता याबाबत पुढील कार्यवाही संबंधित विभागाच्या पातळीवर होत राहील.

– राहुल द्विवेदी, जिल्हाधिकारी

…..

तालुकानिहाय क्षेत्राचे मूल्यांकन :

तालुका गावांची संख्या क्षेत्र मूल्यांकनाची रक्कम

नगर ०६ १ हजार १२१ हेक्टर ५३ कोटी ८६ लाख

राहुरी १२ १३ हजार ५१८ हेक्टर ३२४ कोटी ८२ लाख

पारनेर ०५ १४ हजार १७८ हेक्टर ४१२ कोटी ४९ लाख

…….

Comments

Leave a Reply